Solapur Crime: शेअर बाजारात झालेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी एका तरुणाने माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. आपल्या वृद्ध घरमालकिणीच्या अंगावरील दागिन्यांच्या हव्यासापोटी एका जुन्या भाडेकरूने ७३ वर्षीय महिलेची हत्या केली. टॉवेलने गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीला बार्शी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
बार्शीतील हांडे गल्लीत राहणाऱ्या गंगुबाई कालिदास गडदे (वय 73) या आपल्या वाड्यात एकट्याच राहत होत्या. 25 मार्च रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या. त्यांचे बंधू शशिकांत वायकुळे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गंगुबाई यांचा पाठलाग करताना त्यांचा जुना भाडेकरू चांगदेव गोवर्धन पाटील (वय 35) हा दिसून आला.
असा उघड झाला खुनाचा कट
पोलिसांनी संशयावरून चांगदेवला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी चांगदेवला शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले होते. गंगुबाई यांच्या अंगावर सोन्याच्या पाटल्या, डोरले आणि वेल-फुले पाहून त्याच्या मनात खोट निर्माण झाली. 25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1:30 च्या दरम्यान त्याने गंगुबाईंना आपल्या घरी बोलावले. त्याने गंगुबाईंना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध होताच टॉवेलने तोंड दाबून त्यांची हत्या केली.
पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
हत्या केल्यानंतर आरोपीने गंगुबाईंचे दागिने काढून घेतले आणि त्यांचा मृतदेह एका काळपट रंगाच्या पोत्यात भरला. दुपारी त्याने आपल्या हुंडाई कारच्या डिकीमध्ये मृतदेह टाकून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.


