शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्याबद्दल आपण समाधानी आहे. स्व. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे स्वप्न पुर्ण करण्याची संधी मिळाल्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना. विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. त्यानंतर त्यांनी डॉ. विखे पाटील फौंडेशन येथे ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी केलेल्या सत्काराचाही स्विकार केला.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या जबाबदारीतून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रुपांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे.


