भोकरदन : पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार झाला. भोकरदन-जालना मार्गावरील सोयगाव फाट्याजवळ रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विजय संजय साबळे (वय १७, रा. लिंगेवाडी) असे मृताचे नाव आहे. या अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, लिंगेवाडी येथील गजानन रमेश साबळे हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पुतण्या विशाल संजय साबळे यास घेऊन दुचाकीने भोकरदनकडे येत होते. सोयगाव फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने गजानन साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे पाठीमागे बसलेला विशाल साबळे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्यास तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
या अपघातात गजानन साबळे यांनाही जबर मार लागल्याने ते जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच सहायक उपनिरीक्षक भास्कर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातामधील मृत झालेला विशाल संजय साबळे (१७) हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनामुळे लिंगेवाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती.


