अहिल्यानगर: वारकरी संप्रदायातील भजने शास्त्रीय अंगाने सादर करण्याची परंपरा जपणारे ज्येष्ठ दरबारी गायक जगन्नाथबुवा वाडेकर (वय ८५) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली असून, असा गायक होणे नाही, अशा शब्दांत रसिकांनी आणि शिष्यवर्गाने श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या ५० वर्षांपासून आळंदी–पंढरपूर दरम्यानच्या प्रत्येक एकादशीला होणाऱ्या भजनसेवेत जगन्नाथबुवांचा सहभाग अविरत राहिला होता. त्यांच्या गायकीत भाव, रागदारी आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम पाहायला मिळत असे. त्यांच्या गायनशैलीत कै. मारुतीबुवा दोंदेकर यांच्या परंपरेचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता.
जगन्नाथबुवांचे वडील फक्कडराव वाडेकर हे निजाम इस्टेटमधील पतियाळा घराण्याच्या शैलीत गायन करणारे प्रख्यात गवई होते. वडिलांकडून मिळालेल्या गुरुमंत्रावर चालत जगन्नाथबुवांनी आपली स्वतंत्र दरबारी गायकी विकसित केली. अहिल्यानगर येथून सुरू झालेला त्यांचा संगीतप्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला. त्यांच्या मैफलींमध्ये शास्त्रीय रचना आणि वारकरी परंपरेतील अभंग यांचा सुंदर संगम दिसत असे. आळंदीतील महाएकादशीच्या चक्री भजनांमध्ये जगन्नाथबुवांची गायकी रसिकांच्या हृदयाला भिडणारी ठरली. त्यांचे अनेक भजन अल्बम आणि जुगलबंदी रेकॉर्डिंग्ज आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
हेही वाचा – Shivaji Kardile : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तथापि, आयुष्याच्या उत्तरार्धात या ज्येष्ठ गायकाला हालाखीचे दिवस पाहावे लागले. आरोग्य खालावले, शासनाची मदत न मिळाल्याने त्यांचे शेवटचे दिवस पंढरपूरातील छोट्याशा भाड्याच्या खोलीत कठीण परिस्थितीत गेले. काही दिवसांपूर्वी आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती.
साधी राहणी, मितभाषी स्वभाव आणि गाण्याप्रती असलेली प्रचंड निष्ठा या गुणांमुळेच जगन्नाथबुवा वाडेकर हे वारकरी संप्रदायातील आदराचे स्थान बनले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील भजनप्रेमी आणि संगीतजगत एका भावस्पर्शी आवाजापासून वंचित झाले आहे. महाराष्ट्र जागरण समूहातर्फे त्यांच्या पुण्यस्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.


