BMC Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारीपूर्वी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस (BMC Wards) अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने जारी केलेल्या राजपत्रात ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून ती मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून तब्बल 494 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यांचा सविस्तर विचार करून नगरविकास विभागाने सुधारित प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. अखेर आयोगाने सर्व आक्षेपांचा विचार करून मुंबईच्या 227 प्रभागांची अंतिम रचना निश्चित केली आहे. या नव्या आराखड्यानुसार मुंबईची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 हजार 337 इतकी असून ती 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे.
हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता
दरम्यान, मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक संकेतपूर्ण विधान केले आहे. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे, त्यामुळे माझा अंदाज आहे की दिवाळीनंतर दोन दिवसातच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आपण लगेच निवडणुकीच्या तयारीला लागूया, असं पाटील यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा – राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं संभाव्य वेळापत्रक
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, निवडणूक ही फास्ट ट्रेनसारखी असते, प्लॅटफॉर्मवर जो राहील तो मागे पडतो. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नांसोबत थोडं नशीबही लागतं. यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


