PNG Gas Connection: सध्या जगभरात कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे भारतातही एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमती वाढल्या असून पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर पर्याय म्हणून सरकारने आता ‘पाईप गॅस’ (PNG) जोडणीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, ज्या भागात ही सुविधा उपलब्ध आहे तिथल्या नागरिकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
तीन महिन्यांची मुदत आणि सक्तीचे नियम
मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, ज्या शहरी किंवा ग्रामीण भागात पीएनजीची पाईपलाईन पोहोचली आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांनी पुढील तीन महिन्यांच्या आत नवीन जोडणीसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
कोणाला लागू आहे नियम?
हा नियम घरगुती वापरासोबतच व्यावसायिक गॅस ग्राहकांसाठीही लागू असेल. जर तुमच्या भागात पीएनजीची सुविधा उपलब्ध असूनही तुम्ही त्यासाठी अर्ज केला नाही, तर तुमचे सध्याचे एलपीजी सिलिंडर कनेक्शन कायमचे बंद केले जाऊ शकते.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने पीएनजी नोंदणीचे नियम अत्यंत शिथिल केले आहेत.
१. ज्या कंपन्यांना तुमच्या भागाचे काम दिले आहे, त्यांच्याकडे थेट अर्ज करता येईल.
२. जर कंपनीची माहिती नसेल, तर नागरिक आपला पत्ता आणि अर्जासह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे (District Supply Officer) संपर्क साधू शकतात.
पुरवठा कधी बंद होणार नाही?
भुजबळ यांनी नागरिकांची भीती दूर करताना एक महत्त्वाचा दिलासाही दिला आहे. “जर तुम्ही पीएनजीसाठी रीतसर अर्ज केला असेल, पण तांत्रिक कारणांमुळे कंपनी तुम्हाला कनेक्शन देऊ शकली नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाणार नाही.” म्हणजेच, अर्ज करणे हीच तुमची जबाबदारी आहे.


