Pune Hospital Bomb Case: पुण्याच्या हडपसर परिसरातील रुग्णालयाबाहेर जिवंत बॉम्ब (IED) ठेवून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या एका थरारक मोहिमेत संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नागपूर स्थानकावर असा रंगला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची पक्की माहिती एटीएसला मिळाली होती. ही ट्रेन नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर येताच, दबा धरून बसलेल्या पथकाने तो खाली उतरण्यापूर्वीच त्याला सर्व बाजूंनी घेरले. कोणालाही संशय येऊ न देता अत्यंत शिताफीने ही कारवाई पार पडली. सध्या आरोपीची नागपूर एटीएस कार्यालयात कसून चौकशी केली जात आहे.
नेमकी घटना काय होती?
गेल्या बुधवारी हडपसरमधील कामधेनू इस्टेट येथील उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एक संशयास्पद वस्तू आढळली होती. तपासणीत तो जिवंत आयईडी (IED) असल्याचे स्पष्ट झाल्यावर एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने तो निकामी केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती. मात्र, रुग्णालय परिसरात झालेल्या या प्रकारामुळे पुण्यात भीतीचे सावट निर्माण झाले होते.
तपासाचे चक्र: १०० हून अधिक सीसीटीव्हीचा आधार
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून एटीएस आणि आयबी (IB) यांसारख्या यंत्रणांना पाचारण केले होते. तपास पथकाने परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण केले आणि 15 ते 18 संशयितांची चौकशी केली. अखेर तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचे लोकेशन नागपूरमध्ये निष्पन्न झाले आणि त्याला अटक करण्यात यश आले. या अटकेमुळे आता या कटामागे आणखी कोणाचा हात आहे का? आणि बॉम्ब ठेवण्यामागचा नेमका हेतू काय होता? या प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे.


