Farmer Relief Maharashtra: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मोठ्या मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन किमान 10,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. उद्धाव ठाकरेंनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट भरपाई जमा करण्यात यावी आणि या रकमेवरून बँकांनी कर्जाचे हप्ते वसूल करू नयेत, यासाठी स्पष्ट आदेश द्यावेत. पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रियेमुळे वेळ वाया घालवण्याऐवजी आधी मदत पोहोचवावी आणि नंतर तपासणी करावी, असे त्यांनी सरकारला सुचवले आहे.
त्यांनी केंद्राला जुन्या निकषांऐवजी दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी. तसेच ‘ओला दुष्काळ’ या संज्ञेची बंधने बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत करावी, अशीही मागणी केली. अतिवृष्टीमुळे बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांतील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर जमीन वाहून गेली असून गुरेढोरे, रस्ते आणि घरेही बाधित झाली आहेत. या भीषण परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार हातावर हात धरून बसले असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
हेही वाचा – Pune Weather Alert: पुण्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा; धरणसाठा जवळपास 100 टक्के भरला
सरकारमधील एकही मंत्री बांधावर गेलेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसून परिस्थिती पाहत आहेत. किमान हेलिकॉप्टरने पाहणी करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही टीका करत, स्वतःच्या प्रचारासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी द्या, असा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.


