पुणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळाचा फटका बसला आहे. सोलापूर आणि लातूरमध्ये तर पावसाने थैमान घातल्याने शेतमाल, जनावरे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनो, अतिवृष्टी आपल्या हातात नाही, पण माणुसकी जागी ठेवणे हे आपल्या हातात आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची जनावरेही वाहून जात असल्याच्या बातम्या ऐकून मन हेलावून गेले आहे. शेतकऱ्यासाठी त्याचे जनावर हे कुटुंबातील सदस्यासारखे असतात. त्यांचे झालेले नुकसान कधीच भरून निघणार नाही. म्हणूनच या संकटात त्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे.’
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘या कठीण प्रसंगी प्रत्येक गावागावात पोहोचा. पूरपाण्यात अडकलेल्या आणि मदतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी, जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्यासाठी दिवस-रात्र एक करा. शासन-प्रशासन आपले काम करत आहे, पण ही जबाबदारी केवळ त्यांची नाही. आपण माणूस म्हणून, कार्यकर्ता म्हणून हातभार लावणे आवश्यक आहे. पक्ष, पद, विचार यापलीकडे जाऊन एकजुटीने लोकांच्या पाठीशी उभे राहा.’
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे काही नागरिकांची दुःखद जीवित हानी, अनेक घरांची पडझड, शेतकऱ्यांच्या पिकांचे अपरिमित नुकसान, पशुधनाची जीवित हानी, अशा गंभीर परिस्थितीमुळे…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) September 23, 2025
सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की, ‘आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू. आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी खंबीरपणे उभे राहूया.’


