Dhurandhar 2 Teaser: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत होते, त्या ‘धुरंधर २’ ची पहिली झलक अखेर समोर आली आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी या चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित केला असून, या १ मिनिट १२ सेकंदांच्या व्हिडिओने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली आहे.
संवाद नाही, फक्त ॲक्शनचा थरार!
टीझरची सुरुवात अंगावर शहारे आणणाऱ्या दृश्यांनी होते. संपूर्ण व्हिडिओमध्ये जबरदस्त गनफाईट आणि हाय-व्होल्टेज ॲक्शन पाहायला मिळत असली, तरी रणवीर सिंगचा एकही संवाद यात नाही. मात्र, टीझरच्या शेवटी रणवीरने उच्चारलेला एकच संवाद संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे: “हा नवा भारत आहे, तो घरात घुसून मारेल!” या एका वाक्याने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रवादाची आणि उत्साहाची लाट निर्माण केली आहे.
रणवीरचा आतापर्यंतचा सर्वात ‘खतरनाक’ लूक
या चित्रपटात रणवीर सिंग ‘हमजा’ या पात्राच्या भूमिकेत असून, त्याचा क्रूर आणि रागीट अवतार कथेची भीषणता स्पष्ट करतो. हा चित्रपट केवळ हिंदीतच नव्हे, तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीरसोबतच या चित्रपटात आर. माधवन आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका असून, या स्टारकास्टमुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. सोशल मीडियावर युजर्स याला ‘सिनेमॅटिक बॉम्ब’ म्हणत आहेत. एका चाहत्याने, “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २००० कोटींची कमाई करणार,” असे भाकीत केले आहे, तर अनेकांनी आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘महायुद्धा’ची चिन्हे
‘उरी’सारखा ब्लॉकबस्टर देणाऱ्या आदित्य धर यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर द्यावी लागणार आहे. ‘धुरंधर २’ समोर सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ आणि आदिवी शेष-मृणाल ठाकूर यांचा ‘डकैत’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे आव्हान असणार आहे.


