Nitesh Rane: महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा येथे आयोजित एका जाहीर सभेत अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त विधाने केली आहेत. “हा देवा भाऊंचा महाराष्ट्र आहे, ते घुसून मारतील,” अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला असून, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंब्रा देवी परिसराचे नाव बदलण्यापासून ते मदरशांच्या भूमिकेपर्यंत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रहार केला.
“मदरसे म्हणजे दहशतवाद्यांचे कारखाने”; राणेंचा घणाघात
मदरशांवर बोलताना नितेश राणे यांनी अत्यंत टोकाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मदरशांमध्ये डॉक्टर किंवा अभियंते घडवले जात नाहीत, तर तिथे केवळ दहशतवादी घडवले जातात. सहर युनूस शेख यांच्या विधानाचा संदर्भ देत राणे यांनी आरोप केला की, अशा प्रकारची विचारसरणी केवळ मदरशांमधूनच उगम पावते. “लहानपणापासून अशा व्यक्तींना मदरशांमध्ये जे शिक्षण दिले जाते, त्याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या तोंडून निघणारे हे शब्द आहेत. हे सर्व मदरसे बंद करून या दहशतवाद्यांना हाकलून दिले पाहिजे. धर्मांतरविरोधी कायद्यानंतर आता मदरशांचा क्रमांक आहे,” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
मुंब्राचे नाव बदलून ‘मुंब्रा देवी’ होणार
नितेश राणे यांनी यावेळी नामांतराचा मुद्दाही लावून धरला. इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ केल्याचा दाखला देत त्यांनी मुंब्राचे नाव ‘मुंब्रा देवी’ करण्याची घोषणा केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ‘जितुद्दीन’ असा उल्लेख करत राणे म्हणाले, “कोणताही जितुद्दीन आम्हाला रोखू शकणार नाही. अशा लोकांना मी नाश्त्याला फस्त करतो. जर मी मंत्री नसतो, तर तो जिवंत घरी परतला नसता.” आव्हाडांनी जाहीर सभेत मागितलेल्या माफीची आठवण करून देत त्यांनी टीकास्त्र सोडले.
लव्ह जिहाद आणि ‘देवा भाऊं’चा इशारा
राज्यातील ‘लव्ह जिहाद’ कायद्याचा उल्लेख करत नितेश राणे यांनी कडक इशारा दिला. “आता कोणत्याही शाहरुख किंवा आमिरने आमच्या हिंदू भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, अन्यथा त्यांना सात वर्षांसाठी तुरुंगात जावे लागेल,” असे ते म्हणाले. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी ‘धुरंधर’ चित्रपटातील संवादाचा आधार घेत ठणकावून सांगितले की, “हा देवा भाऊंचा महाराष्ट्र आहे, ते घुसून मारतील.” त्यांच्या या विधानानंतर आता मुंब्र्यासह ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.


