सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे अनेक बाहेरच्या रेडीमेड पदार्थांवर भर दिला जातो. त्यात ब्रेड, पास्ता इत्यादी खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा अनुभव अनेकांना येतो. ब्रेड, पास्ता किंवा पास्तामधील ग्लूटेन हे पोट फुगणे किंवा गॅस होण्याचे कारण असल्याचे म्हटले जाते. मात्र, अभ्यासातून हे कारण नसल्याचे सिद्ध झाले आहे.
ग्लूटेन सेन्सिटिव्ह लोकांना अनेकदा पोटफुगी, अतिसार किंवा गॅसचा त्रास होतो आणि ग्लूटेन घेणे बंद केल्यानंतर त्यांची लक्षणे अनेकदा नाहीशी होतात. नवीन संशोधनातून असे समोर आले की, या लक्षणांचे खरे कारण ग्लूटेन नसून काहीतरी वेगळे असू शकते. ग्लूटेन पोटफुगी आणि गॅसचे कारण नव्हते. तर गव्हामध्ये आढळणारे इतर संयुगे होते ज्याला फर्मेंटेबल कार्बोहायड्रेट्स म्हणतात. ज्यामुळे गॅस तयार होतो. ते आतड्यात पाणी देखील ओढतात, ज्यामुळे पोटफुगी, अतिसार आणि वेदना होऊ शकतात. जर एखाद्याला आधीच गॅस किंवा पोटफुगी असेल तर त्यांची अस्वस्थता वाढू शकते.
गहू, बार्ली आणि राईमध्ये ग्लूटेन आढळते आणि सेलिआक ही अशी समस्या आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होतो. ज्यामुळे शरीर स्वतःच्या लहान आतड्यावर हल्ला करते, ज्यामुळे पोषक तत्वांचे योग्य शोषण रोखले जाते. सेलिआक रोग ग्लूटेनच्या सेवनामुळे होतो, म्हणून ही स्थिती असलेल्यांना ग्लूटेन-मुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.


