आपल्यापैकी अनेकजण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सप्लिमेंट्स घेत असतील. मात्र, तुमचं असे करणं आता आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) आरोग्य अधिकाऱ्यांनी २९ सप्लिमेंट्सबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ज्यात विषारी घटक असण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. हे सप्लिमेंट्स ‘तेजोकोट रूट’ किंवा ‘ब्राझील सीड’ असल्याचे सांगून विकले जात होते.
ऑनलाईन सप्लिमेंट्स आपल्यापैकी अनेकजण घेत असतील. मात्र, ते आता टाळण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी आणि अँटीऑक्सिडंट्ससाठी वापरले जातात. मात्र, तपासणीत असे उघड झाले की या उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात ‘यलो ओलिअँडर’ नावाची एक विषारी वनस्पती होती. ही वनस्पती मूळची मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील असून आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानली जाते. एफडीएच्या मते, यलो ओलिअँडरच्या सेवनाने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे हृदय, मेंदू आणि पचनसंस्थेच्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, यामुळे हृदयविकाराचा झटका, पोटदुखी, गोंधळ आणि इतर गंभीर लक्षणे देखील उद्भवू शकतात, जी जीवघेणी ठरू शकतात.
हे सप्लिमेंट्स ॲमेझॉन, ईबे आणि एट्सी यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच अनेक वेबसाईट्सवर विकले जात होते. एफडीएने आता लोकांना या उत्पादनांचा वापर ताबडतोब थांबवण्याचा आणि त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला आहे. जर तुमच्याकडेही हे सप्लिमेंट्स असतील तर ते न वापरण्याचा इशाराही दिला गेला आहे.


