Birth and Death Certificate Scam: यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीमध्ये एक संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १३०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावातून तब्बल २७,००० हून अधिक जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. या महाघोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसंख्येपेक्षा नोंदी २० पटीने जास्त
शेंदुरसनी गावाची अधिकृत जनगणना अत्यंत मर्यादित असताना, नागरी नोंदणी प्रणालीत (CRS) झालेल्या या नोंदींनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. केवळ तीन महिन्यांच्या अल्पावधीत २७,३९८ प्रकरणांची ‘विलंबित जन्म नोंदणी’ करण्यात आली. गावाच्या मूळ लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा विसंगत असल्याने, डिजिटल पोर्टलचा वापर करून बनावटगिरी केली गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सायबर पोलीस आणि आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गृह विभागाने कंबर कसली असून, अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (महाराष्ट्र सायबर) नेतृत्वाखाली ‘SIT’ स्थापन केली आहे. या पथकात तांत्रिक तज्ज्ञांसह जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालकांचाही समावेश आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीच आयटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासात प्रमाणपत्रे नेमकी कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून अपलोड झाली, याचा शोध घेतला जाईल. ज्यांच्या नावावर हे दाखले काढले गेले, त्या व्यक्तींचे अस्तित्व आणि त्यांचा या गावांशी असलेला संबंध तपासला जाणार आहे. तसेच सरकारी सॉफ्टवेअरमधील पळवाटा शोधून भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी नवी नियमावली तयार केली जाईल. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एखादे मोठे रॅकेट बनावट दाखले तयार करत होते का? याचा शोध आता हे विशेष पथक घेणार आहे. या आठवड्यात SIT प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.


