Mayor Election 2026: केडीएमसीच्या राजकारणात एक अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. संख्याबळ असूनही आरक्षणाच्या एका गुगलीमुळे भाजपला महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ५३ नगरसेवक असलेल्या शिवसेनेकडे (शिंदे गट) सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. या साऱ्या राजकीय नाट्यात अटाळीच्या नगरसेविका हर्षाली थविल यांचे नाव शहराच्या पहिल्या नागरिक म्हणून आघाडीवर आले आहे.
साधी राहणी, मोठी स्वप्ने: कोण आहेत हर्षाली थविल?
हर्षाली थविल यांची चर्चा केवळ आरक्षणापुरती मर्यादित नाही. त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या असून आजही एका साध्या भाड्याच्या घरात राहतात. कॉर्पोरेशनच्या राजकारणात जिथे कोट्यवधींची उलाढाल होते, तिथे एक सामान्य कुटुंबातील महिला शहराचे सर्वोच्च पद भूषवणार असल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुतीचं गणित: मनसेची साथ, भाजपचा नवा प्लॅन
केडीएमसीच्या सभागृहात सत्तेचे समीकरण आता स्पष्ट होत आहे:
- शिवसेना (शिंदे गट): ५३ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष. महापौरपदासाठी हर्षाली थविल आणि किरण भांगले हे दोन पर्याय सज्ज आहेत.
- भाजप: ५० नगरसेवक असूनही प्रवर्गातील उमेदवार नसल्याने महापौरपदाची संधी हुकली. आता भाजप उपमहापौरपद आणि स्थायी समिती यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक पदांवर आपला दावा ठोकणार आहे.
- मनसे: राज ठाकरेंच्या ५ नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
- ठाकरे गट: ११ नगरसेवकांसह विरोधी पक्षात बसण्याची चिन्हे आहेत.


