Satara Crime: एकीकडे करिअरची स्वप्ने उराशी बाळगण्याची वय, तर दुसरीकडे एका लहानशा चुकीमुळे आलेले नैराश्य याच संघर्षातून सातारा जिल्ह्यातील पाटण येथील एका तरुणाने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध ‘केटस् पॉइंट’वरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (१८) याने आपले आयुष्य संपवले.
घरातून बाहेर पडला अन् घात झाला
ढेबेवाडी (ता. पाटण) येथे गेल्या २० वर्षांपासून स्थायिक असलेल्या सोळंकी कुटुंबाचा बेकरी आणि स्वीट्सचा व्यवसाय आहे. कुटुंबातील धाकटा मुलगा भगवतसिंह हा शुक्रवारी (२३ जानेवारी) घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, अखेर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तांत्रिक तपासात त्याचे शेवटचे लोकेशन महाबळेश्वर दाखवत असल्याने पोलिसांची धाकधूक वाढली होती.
४०० फूट खोल दरीत रेस्क्यू ऑपरेशन
पाचगणी पोलिसांनी तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला पाचारण केले. रविवारी केटस् पॉइंटच्या अत्यंत दुर्गम अशा ४०० फूट खोल दरीत उतरल्यानंतर रेस्क्यू टीमला भगवतसिंहचा मृतदेह आढळून आला. सुनील भाटिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शर्थीने हा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
नैराश्याचे कारण ठरली ‘सीईटी’ परीक्षा?
प्राथमिक माहितीनुसार, भगवतसिंहने ‘सीईटी’ (CET) परीक्षेचा फॉर्म भरला नव्हता. या एका तांत्रिक चुकीमुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, या भीतीतून तो प्रचंड तणावाखाली होता. याच नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत भगवतसिंहचा मोठा भाऊ डॉक्टर आहे, तर तो स्वतःही उच्च शिक्षणाची तयारी करत होता.
कुटुंबाचा काळजाला पीळ पाडणारा आक्रोश
शवविच्छेदनानंतर जेव्हा भगवतसिंहचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, तेव्हा ढेबेवाडी परिसरात शोककळा पसरली. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून सोळंकी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.


