Pune Crime : पुणे शहराच्या गुन्हेगारी विश्वातून एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. वाघोली येथील बाईफ रोड परिसरात एका आईने आपल्याच रक्ताच्या नात्याला रक्ताने माखले आहे. ११ वर्षांच्या मुलाची हत्या करून १३ वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या या मातेच्या कृत्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या बंद खोलीत नेमकं काय घडलं?
मूळची नांदेड (कंधार) येथील रहिवासी असलेली आरोपी सोनी संतोष जायभाय हिने राहत्या घरात हा भीषण रक्तपात घडवला. घरातील पांढऱ्या फरशीवर सांडलेला रक्ताचा सडा पाहताना पोलिसांच्या काळजाचाही थरकाप उडाला. या महिलेने धारदार शस्त्राने केलेला वार साईराज (वय ११) याच्यासाठी जीवघेणा ठरला, तर मोठी मुलगी धनश्री (वय १३) हिने या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला. ती सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वाघोलीत गुन्हेगारीचा विळखा
गेल्या दोन दिवसांतील वाघोलीतील ही दुसरी मोठी घटना आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “जी आई मुलांचे संरक्षण करते, तीच त्यांची भक्षक कशी झाली?” या विचाराने नागरिक सुन्न झाले आहेत. पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या असून, या कृत्यामागचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
तपासाचे प्रमुख धागेदोरे
आरोपी महिला दीर्घकाळ नैराश्यात किंवा मानसिक तणावाखाली होती का? तसचे घरात पती किंवा अन्य नातेवाईकांशी असलेले संबंध या कृत्याला कारणीभूत ठरले का? घटनेच्या वेळी असे काय घडले की एका आईने थेट मुलाला संपवलं? याचा शोध वाघोली पोलीस घेत आहेत.


