Malad Station Murder: पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात शनिवारी एका तरुण प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाली. सुरुवातीला ही घटना ट्रेनमधील गर्दी आणि धक्काबुक्कीतून घडल्याचे वाटले होते, मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. २७ वर्षीय ओंकार शिंदे याने एन.एम. कॉलेजचे गणिताचे प्राध्यापक आलोक सिंह (३१) यांच्या पोटात चिमटा खुपसून त्यांची हत्या केली. या धक्कादायक कृत्यामागे ‘महिलांसमोर झालेला अपमान’ आणि त्यातून आलेला ‘टोकाचा पुरुषी इगो’ हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
अपमान, इगो आणि अन् हत्या
माजी आमदार कपिल पाटील यांनी सोशल मीडियावर या घटनेवर भाष्य करताना काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, ओंकार शिंदेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. तो एक सामान्य कष्टकरी तरुण होता. मात्र, लोकलमधून उतरताना झालेल्या वादात महिलांसमोर आपला अपमान झाला, ही भावना ओंकारच्या मनात घर करून गेली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्याकडील धारदार चिमट्याने आलोक सिंह यांच्यावर हल्ला केला. हा वार इतका भीषण होता की तो थेट किडनीपर्यंत पोहोचला आणि अतिरक्तस्रावामुळे एका बुद्धिमान शिक्षकाचा अंत झाला.
समाजातील वाढती असहिष्णुता
या घटनेने मुंबईकरांच्या प्रवासातील वाढता मानसिक ताण आणि संपत चाललेला संयम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. कपिल पाटील यांनी म्हटलं आहे की, मारणारा ओंकार १५-१६ हजार कमावणारा तरुण, तर मरणारे आलोक सिंह कंत्राटी शिक्षक म्हणून जेमतेम २० हजार कमवणारे. दोघेही कष्टकरी वर्गातील असूनही एकमेकांचे शत्रू का बनले? भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाखाली समाजात जे विष पेरले जात आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. सामान्य माणूस व्यवस्थेवर राग काढण्याऐवजी आपल्यासारख्याच दुसऱ्या कष्टकरी माणसाला शत्रू मानू लागला आहे. महिलांसमोर अपमान झाला म्हणून थेट जीव घेण्यापर्यंत मजल जाणे, हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे.
आलोक सिंह यांच्या पश्चात त्यांची गर्भवती पत्नी आणि वृद्ध वडील असा परिवार आहे. एका बाजूला एका निष्पाप तरुणाचा जीव गेला, तर दुसऱ्या बाजूला कोणताही गुन्हा अंगावर नसलेला ओंकार आता तुरुंगात राहणार आहे. रेल्वेतील गर्दी, दररोजचा प्रवास आणि वाढता मानसिक तणाव यामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ आता हिंसक बनत चालली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.


