Mohan Bhagwat on AI : नागपूर पुस्तक मेळाव्यात बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना मानवांनीच यंत्रांचे नियंत्रण राखले पाहिजे, असे ते म्हणाले. एआय थांबवणे शक्य नाही, परंतु ते वापरणारे आपण आहोत की वापरले जाणारे हे आपण ठरवायचे आहे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. मोबाईल फोनचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की एकेकाळी फोन हा आपल्यासाठी साधन होता, परंतु आता लोक फोनच्या अधीन झाल्यासारखे दिसतात.
मानवहितासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
भागवत यांनी एआयचा योग्य वापर मानवकल्याणासाठी व्हायला हवा, असे स्पष्ट केले. तंत्रज्ञानामुळे मानवी भावनांचा ऱ्हास होईल अशी भीती व्यक्त होत असली, तरी अशा परिस्थिती येण्यापूर्वीच आपण सज्ज व्हायला हवे, असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, साधने ही फक्त साधने असतात. ती कशी आणि कुठे वापरायची हे ठरवणे मानवाच्या हातात आहे.
भावना, बुद्धी आणि तंत्रज्ञानात संतुलन आवश्यक
मानवी जीवन हे केवळ भौतिक सुखावर चालत नाही. मन, बुद्धी आणि आत्मिक आनंद यांच्यात संतुलन आवश्यक असते, असे भागवत यांनी सांगितले. हे संतुलन जपले, तर एआयच्या युगातही मानव स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहू शकतो आणि तंत्रज्ञानाचा स्वामी बनू शकतो, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.


