Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघ प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूर दौऱ्यादरम्यान हिंदू समाजाबाबत केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. भागवत यांनी हिंदू समाज टिकून राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटलं की, “हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व राहणार नाही.”
मणिपूरमधील सभेत भागवत यांनी ऐतिहासिक उदाहरणाद्वारे भारताच्या सांस्कृतिक टिकावाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, ग्रीस (यूनान), मिस्र आणि रोम यांसारखी महान संस्कृती किंवा साम्राज्य काळाबरोबर नष्ट झाली तरी भारताने आपले अस्तित्व कायम राखले आहे. त्यांच्या मते, भारताचे सामाजिक आणि धार्मिक नेटवर्क असे मजबूत आहे की हिंदू समाज टिकून राहील आणि त्यामुळे भारताचे अस्तित्वही कायम राहील.
भागवत यांनी पुढे म्हटले, “जगभरातील अनेक देशांनी विविध संकटांचा सामना केला, काही नष्ट झाले. परंतु भारताचा समाज टिकला आहे, कारण त्याने आपली सांस्कृतिक आणि सामाजिक रचना तयार केली आहे. हिंदू समाज टिकला नाही तर जगही टिकणार नाही.” मणिपूर दौऱ्यादरम्यान भागवत यांनी राज्यातल्या हिंसाचारानंतर लोकांशी संवाद साधला आणि आपल्या वक्तव्याद्वारे सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.


