Jalgaon Municipal Election 2026: राज्यातील महापालिका (Election) निवडणुकांसाठी मतदान होत असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी सरासरी 30 टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. मात्र, काही महापालिका क्षेत्रात गटातटात आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आता जळगावमध्ये (Jalgaon) गोळीबार (Firing) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे, याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.
जळगाव शहर महानगरपालिका निवडणूकीत दुपारी. 1.30 पर्यंत २२ टक्के मतदान झाले.
पुरुष मतदान = 54132
स्त्री मतदान = 44509
एकूण मतदान = 98641
टक्केवारी =22.49 %
तरुणांमध्ये वादानंतर गोळीबार
जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती असून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर, पोलिसांचा मोठा फौजफाटा पिंप्राळा परिसरात दाखल झाला असून गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला अद्याप स्पष्ट नाही. आता, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार करणाऱ्या तरुणांचाही शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली. गोळीबारच्या घटनेवर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली आहे. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, जनतेने निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.


