Ganesh Dongare Accident: पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीला गेलेल्या एका कष्टकरी कुटुंबावर नियतीने अत्यंत भीषण घाला घातला आहे. लातूर जिल्ह्यात ऊस वाहतूक सुरू असताना, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून बीडचा रीलस्टार तरुण गणेश डोंगरे याचा जागीच मृत्यू झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे, ज्या क्षणी हा अपघात घडला, त्या क्षणी त्याची पत्नी फेसबुक करत लाईव्ह होती. आपल्या पतीचा अंत तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.
तीन मुलींची जबाबदारी
वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी असलेला गणेश अवघ्या एक एकर जमिनीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हता. पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे कुटुंब वृद्ध आई-वडील आणि तीन चिमुकल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी गावं सोडून ऊसतोडणीला गेले होते. मेहनतीच्या जिद्दीवर गरिबीतून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गणेशचा प्रवास अशा प्रकारे संपेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी लातूरमधील एका साखर कारखान्यावर ऊस भरलेला ट्रॅक्टर मोजणीसाठी उभा होता. याच दरम्यान जवळून जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रॅक्टरची ट्रॉली निसटली आणि थेट गणेशच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेशचा जागीच मृत्यू झाला. गणेशची पत्नी अश्विनी ही पतीला कामात मदत करण्यासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असायची. अपघात झाला तेव्हा ती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधत होती. मात्र, काही कळायच्या आतच तिच्या मोबाईल स्क्रीनसमोर तिचं कुंकू पुसलं गेलं. पतीचा असा करुण अंत पाहून तिने केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
कुटुंबाचा आधार हरवला
गणेशच्या जाण्याने डोंगरे कुटुंबाद्वारे पाहिलेली स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. म्हाताऱ्या आई-वडिलांचा आधार आणि तीन चिमुकल्या मुलींचे पितृछत्र हरपल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक मेहनती ऊसतोड कामगार आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला तरुण अशा प्रकारे गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


