Dattatray Bharne: पूर्वी कोणतीही बँक कर्ज देत नव्हती, कर्ज घेण्यासाठी काहीतरी तारण ठेवावे लागायचे,लोकांना वेळेवर कर्ज मिळत नव्हते, कर्जासाठी अनेक वेळा बँकेत हेलपाटे घालावे लागायचे मात्र महिला स्वयंसहायता समूहाने बँकांचा इतका मोठा विश्वास निर्माण केलेला आहे की बँका आज त्यांना कोणतीही गोष्ट तारण न ठेवता कर्ज देतात… त्यामुळे भगिनींनो कर्ज घेणे ही संधी आहे आणि त्या संधीचा लाभ जास्तीत जास्त घ्या असे गौरवोद्गार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांना महाकर्जवाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात ७ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज वितरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादीचे हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, बँक ऑफ महाराष्ट्र चे महिलाल मीना, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, विविध बँकेचे बँक व्यवस्थापक उपस्थित होते… यावेळी १६७ समूहांना एकूण सात कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे कर्जवाटप कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, महिलांची दखल फक्त राज्यात नाही तर संपूर्ण जगाने घेतली आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे…महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चांगलं काम चालू आहे, महिला कोणताही समूह एनपीएमध्ये जाऊ देत नाहीत यामध्ये सीआरपी ची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे समूह व्यवस्थित चालू आहेत. भगिनींनो तुमच्यासोबत तुमचा मामा तर असेलच पण हा मामा सुद्धा तुमच्या सोबत कायम उभा असेल हा शब्द मी तुम्हाला देतो.. बँकाचे असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर मी कायम तुमच्या सोबत असेल असं आश्वासन यावेळेस कृषिमंत्री भरणे यांनी दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी करताना गत वर्षांमध्ये तालुक्याला 33 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत तालुक्याने 31 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून शंभर टक्के उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.
महिलांनी महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभा केलेले आहेत व त्या व्यवसायातून त्या महिला आता महिला उद्योजिका होत असल्याने येणाऱ्या काळात लखपती दीदी मोठया उद्योजक होतील याचे समाधान व्यक्त केले. यावेळी बँक अधिकारी महेश शेळके, वैभव लाहोत, अमोल वाघमारे, शरद सूळ, रोहिदास राठोड, अशोक थोरात, जयदीप तोरणे, अशोक भिसे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी ननवरे, आदित्य मांदळे, अमोल गलांडे,सुनिता दातखिळे, ज्ञानेश्वर राऊत,अमर कदम, निर्मला निमगिरे, चेतन रांजणकर, तेजस्विनी शिंदे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन समाधान भोरकडे यांनी केले.


