Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बुधवारी (३ सप्टेंबर) झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. “तुमच्या बापाचं राज्य आहे का? संविधानापेक्षा मोठे झालात का? तुम्ही जनतेसाठी काम करता की खाजगी व्यक्तींसाठी?” असा थेट सवाल करत त्यांनी जलसंधारण, ग्रामसडक आणि भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी कामांची गती आणि दर्जा सुधारण्याचा इशारा दिला.
नेमकं काय घडलं?
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सीईओ डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार आणि प्रकल्प अधिकारी मेघराज पवार उपस्थित होते. मात्र, इतर आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने खासदारांचा संताप अधिकच वाढला.
जलसंधारण विभागाला फटकार
खासदार ओमराजे यांनी जलसंधारण विभागाचे अधिकारी महामुनी यांना प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ते संतप्त झाले. “कामे वेळेवर आणि दर्जेदार करा. तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रारी आल्या आहेत. कारभार सुधारला नाही, तर कारवाईला सामोरे जा,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
ग्रामसडक योजनेची पोलखोल
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३२ पैकी फक्त १० कामे पूर्ण झाल्याचे समोर आले. २२ कामांपैकी १७ रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी ८ कामे पुलांची, तर ९ कामे तक्रारींमुळे थांबली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, ओमराजे यांनी हे उत्तर फेटाळत, “कामांची गती निराशाजनक आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनता त्रस्त आहे. तातडीने डागडुजी करा,” असे आदेश दिले.
भूसंपादन अधिकाऱ्यांना खडसावले
तुळजापूर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासंदर्भात भूसंपादनाच्या अडचणी सांगितल्या गेल्या. अधिकाऱ्यांनी “सहा पत्र पाठवूनही कार्यवाही झाली नाही,” अशी तक्रार केली. यावर ओमराजे यांनी संताप व्यक्त करत, “सहा पत्रांनंतरही कारवाई नाही, याचा अर्थ कारभार ढिसाळ आहे. हा प्रश्न तात्काळ सोडवा,” असा स्पष्ट आदेश दिला.
आमदारांची अनुपस्थितीवर टीका
बैठकीला आमंत्रित असलेल्या सर्व आमदारांपैकी फक्त कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी उपस्थित होते. इतर आमदारांच्या अनुपस्थितीवर ओमराजे यांनी नाराजी व्यक्त केली. “मी खासदार असून मला विचारलं नाही, मग तुम्ही कोणासाठी काम करता?” असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.


