Beed Accident News : बीड जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज (30 ऑगस्ट) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळच्या सुमारास नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. कंटेनरचा प्रचंड वेग इतका होता की, सहा जणांना त्याने थेट चिरडले. या घटनेने परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र चौघांचा आधीच मृत्यू झाला होता.
अपघातामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाहनांच्या बेफाम वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ असाच एक भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये 5-6 जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कंटेनर चालक ताब्यात
बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मृत आणि जखमींची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.


