Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरु केलेलं उपोषण आज दुसऱ्या दिवशीही तीव्रतेने सुरू आहे. लाखो मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले असून, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव वाढत आहे. याचवेळी, राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला असून, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली.
ही समिती 25 जानेवारी 2024 रोजी स्थापन झाली होती आणि यापूर्वी तिचा कार्यकाळ 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता. तसेच, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानुसार, तालुकास्तरीय समितीला सहा महिने अधिक मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आझाद मैदानात लाखोंचा समुदाय, कडक पोलीस बंदोबस्त
मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आझाद मैदानात केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु लाखो आंदोलक उपोषणासाठी दाखल झाल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. चार सुरक्षा पथके, मुंबई पोलीस, सीआयएसएफ, धडक कृती दल आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी आंदोलकांशी समजूत काढण्याचा प्रयत्नही केला आहे.


