मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष ढवळे यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. याबाबतची तक्रार शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कार्यालयातून ढवळे यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
संतोष ढवळे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी यवतमाळमधून निवडणूक लढवली होती आणि भाजपचे मदन येरावार यांच्याकडून केवळ १,००० मतांनी पराभूत झाले होते. आता पक्षातून हकालपट्टी झाल्याने यवतमाळच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात असून, आगामी निवडणुकीत याचा परिणाम दिसू शकतो. ढवळे यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


