Bacchu Kadu : राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सलग तीन महिन्यांपासून न मिळाल्याने दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या मुद्द्यावर आता विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.
राज्यात ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र फेब्रुवारीपासून अनेक लाभार्थ्यांना हे अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील अनेक नेत्रहीन दिव्यांगांनी मुख्यमंत्री कार्यालय गाठत आपली व्यथा मांडली.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, नेत्रहीन बांधवांना मंत्रालयापर्यंत मोर्चा काढावा लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. त्यांनी सांगितले की, या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि संबंधित सचिवांशी चर्चा केली आहे.
यूटीआय कार्ड मिळेपर्यंत मानधन रोखण्याचा शासन निर्णय चुकीचा असून तो तातडीने रद्द करण्यात यावा. कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर 19 मे रोजी मंत्रालयात आंदोलन छेडावे लागेल.
दरम्यान, अनेक नेत्रहीन दिव्यांग रोजंदारीवर गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे विकून उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे हे अनुदानच त्यांच्यासाठी आधार ठरते. त्यामुळे हे पैसे नियमितपणे मिळावेत, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे.


