BMC Standing Committee : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत महापौरपद निश्चित झाल्यानंतर आता सत्तेचा खरा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या समित्यांचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षांमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेतील चार महत्त्वाच्या समित्यांचे वाटप पूर्ण झाले असून, त्यातील सर्वाधिक महत्त्वाची स्थायी समिती (Standing Committee) भाजपकडे राहणार आहे. यासोबतच शिक्षण समिती देखील भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर सुधार समिती आणि बेस्ट समिती (BEST Committee) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती ही पालिकेच्या तिजोरीची चावी मानली जाते. विकासकामांसाठी निधी वाटप, खर्चाला मंजुरी यासारखे महत्त्वाचे निर्णय याच समितीकडून घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाला महापौरपदाइतकंच महत्त्व दिलं जातं. शिंदे सेनेने स्थायी समितीत योग्य वाटा मिळावा, यासाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपने ही समिती आपल्याकडे ठेवत पालिकेच्या कारभारावर नियंत्रण कायम ठेवल्याचं चित्र आहे.
दरम्यान, भाजपने गेल्या आठवड्यात मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली होती. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे उपमहापौरपद केवळ सव्वा वर्षासाठी देण्यात आलं असून, त्यानंतर शिंदे सेनेतील दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला ठाकरे गटाकडून महापौरपदासाठी उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने मराठी उमेदवार म्हणून रितू तावडे यांचे नाव जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाने ‘मराठी महापौराला विरोध नाही’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.


