Weather Alert : राज्यासह देशभरातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसासोबतच उकाड्याचाही अनुभव येत आहे. महाराष्ट्रातून थंडी जवळपास गायब झाली असली, तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्याप कडाक्याची थंडी कायम आहे. हवामानातील या चढउतारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
राज्यात निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. दुपारच्या वेळेत उकाडा जाणवणार असून, पुढील काही तासांत तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील अनेक भागांत आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार
भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईत पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 204 इतका नोंदवण्यात आला आहे, जो ‘वाईट’ श्रेणीत मोडतो. पीएम 10 चे प्रमाण 180 तर पीएम 2.5 चे प्रमाण 151 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दृष्यमानतेवरही परिणाम होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
पुढील 48 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू शकतो. मुंबईत सकाळच्या वेळेत धुरकट वातावरण राहील, तर दुपारनंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहणार असल्याने उन्हाचा चटकाही जाणवेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज राज्यात संमिश्र हवामान पाहायला मिळेल. काही भागांत थंडीची लाट, तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान असून, काही भागांत मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. देशातील काही भागांत पाऊस, काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी थेट उकाडा जाणवत असून, या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचं चित्र आहे.


