मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात घडलेल्या या भयावह घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये टॉयलेटच्या कचऱ्याच्या डब्यात सापडलेल्या ७ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्राथमिक तपासात मुलीचे अपहरण आणि हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, तिच्या मामाचा सहभाग असल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
रेल्वे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर थांबलेल्या कुशीनगर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २२५३७) च्या एसी कोच बी२ च्या शौचालयात ही भयानक घटना घडली.
एका प्रवाशाने टॉयलेट वापरताना कचऱ्याच्या डब्यात काही संशयास्पद दिसल्यावर त्याने तपास केला, तेव्हा त्यात सुमारे ७ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. ही बाब पाहून प्रवाशांमध्ये भीती आणि घबराट निर्माण झाली. लगेचच दुपारी २:४५ वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना आणि रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ट्रेनमधील इतर प्रवाशांना या बातमीची कल्पनाही नव्हती, पण माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपस्थित प्रवाशांचे जबाब नोंदवले आणि ट्रेनला काशीला रवाना करण्यात आली.
मुलगी सुमारे ७ वर्षांची असून, तिची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात तिचे अपहरण झाल्याचे समोर आले असून, हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह ट्रेनच्या एसी कोचच्या शौचालयात लपवण्यात आल्याने हे अपराध नियोजित असल्याचे पोलिसांना वाटते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.


