मुंबई : राज्यातील महिलांना सक्षम बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलणाऱ्या महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना पुढील पाच वर्ष सुरूच राहणार अशी, ग्वाही दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक कितीही टीका करोत, तरी लाडक्या बहिणींसाठीची कोणतीही योजना बंद होणार नाही. येत्या काळात राज्यात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे मोठे ध्येय साध्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांनी पाठविलेल्या हजारो राख्यांचा सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस योजना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध योजनांद्वारे महिलांना त्यांच्या पायावर उभे करत आहोत. विरोधक लाडक्या बहिणी योजनांबाबत शंका घेतात, पण मी आश्वासन देतो की, २०२९ पर्यंत या सर्व योजना सुरू राहतील आणि त्यानंतरही आम्ही सत्तेत आल्यास पुढे चालू ठेवू.
त्यांनी पुढे सांगितले की, बहिणींच्या आशीर्वादाने २०२९ मध्येही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येईल. महिलांच्या सहकारी संस्थांना हक्काचे स्थान देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.” फडणवीस यांनी देशातील मातृशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले आणि महिलांच्या मान-सन्मानासाठी महायुती सरकार नेहमी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने नवीन ऊर्जा मिळाली आहे.
‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानात ३६ लाख ७८ हजार राख्या
भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांनी पाठविलेल्या तब्बल ३६ लाख ७८ हजार राख्यांचा सोहळा शनिवारी मुंबईत साजरा झाला. या अभियानाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महिलांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, “देवाभाऊंचे अविरत कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आहे. हे प्रेम आणि राख्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहेत.


