Toll Plaza : देशभरातील वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, टोल प्लाझावरील पेमेंट व्यवस्था पूर्णपणे कॅशलेस करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. यानंतर वाहनधारकांना फक्त FASTag किंवा UPIच्या माध्यमातूनच टोल भरावा लागणार आहे.
सध्या अनेक टोल प्लाझांवर कॅश पेमेंटमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मात्र, FASTag आणि UPIमुळे काही सेकंदांत टोल भरता येणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे. सुट्ट्या पैशांसाठी थांबण्याचा त्रासही संपणार आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय डिजिटल इंडिया आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देणारा मानला जात आहे. नवीन व्यवस्थेमुळे टोल प्लाझांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच पेमेंटचे डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध राहणार आहे.
कॅशलेस टोल प्लाझाचे फायदे
वेळेची बचत
वाहतूक कोंडी कमी
सुट्ट्या पैशांचा त्रास संपणार
सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार
डिजिटल पेमेंटचा थेट रेकॉर्ड
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी सांगितले की, UPIद्वारे टोल भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता टोल प्लाझांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


