खोपोली : खोपोलीत घडलेल्या मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी भरत भगत याला अखेर खालापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. मात्र, हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची १६ डिसेंबर रोजी राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मुख्य मारेकरी यापूर्वीच अटक करण्यात आले असून, कटामागील सूत्रधारांचा शोध सुरू होता.
तपासादरम्यान, या हत्येचा कट रचण्यात भरत भगत यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते फरार झाले होते. अखेर खोपोली पोलिसांनी सापळा रचत त्यांना अटक केली.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले सुधाकर घारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. घारे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून, लवकरच आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


