मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी एका हॉटेलचं थेट तुरुंगात रूपांतर केलं आहे.”
राऊत यांनी आरोप केला की, निवडून आलेल्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये भीतीपोटी डांबून ठेवण्यात आलं आहे. “हे नगरसेवक जिंकले असले तरी त्यांना मोकळेपणाने निर्णय घेऊ दिला जात नाही. त्यांना तिथून तात्काळ सोडण्यात आलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “अनेक नगरसेवक आमच्या थेट संपर्कात आहेत. मुंबईत भाजपचा महापौर कोणालाच नको आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनाही भाजपचा महापौर नको आहे,” असा दावा करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं.
मुंबईतील महापौरपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून, राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.


