ठाणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सविस्तर बैठक झाली. यावेळी आमदार अॅड. निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर हे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना, विभागांमधील समन्वय, तातडीच्या सेवा उपलब्धतेबाबतची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे, बचाव पथके व साधनसामग्री तत्काळ उपलब्ध करून देण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. माहितीचे वेगवान आदानप्रदान, नियंत्रण कक्षाची कार्यक्षमता आणि सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे प्रभावित भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बचाव व मदत कार्याची गती, पुनर्वसनाची तयारी, आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यावर चर्चा झाली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीचे निर्णय घेण्यात आले.
आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, “राज्य सरकार व जिल्हा प्रशासन हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून, अतिवृष्टीमुळे प्रभावितांना तातडीची मदत व योग्य पुनर्वसन मिळावे यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलली जात आहेत.”


