यवतमाळ : राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, तर दुसरीकडे कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
यवतमाळच्या पुसद येथे हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने 13 प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड बोलत होते.
संजय राठोड म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात कर्जमाफीबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. यासोबतच, त्यांनी पुसदच्या माळ पठारावरील 40 दुष्काळग्रस्त गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही यासाठी अन्नत्याग आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत दिले होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यापूर्वी कर्जमाफीबाबत महायुतीच्या जाहीरनाम्याप्रमाणे कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले होते. आता संजय राठोड यांच्या वक्तव्यातून कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
पावसामुळे नुकसान, ओला दुष्काळाची मागणी
राज्यात सध्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये पिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीबरोबरच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकरी संघटनांनी यासाठी आंदोलने तीव्र केली असून, सरकारवर दबाव वाढत आहे.


