पुणे : “स्वदेशीचा नारा देताना आधी स्वदेशी शेतकऱ्यांना जगवा! शेतमालावरील बंधने हटवा,” असा उपरोधिक सल्ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला दिला आहे. पुण्यातील जुन्नर येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे कौतुक केले आणि सरकारच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
शरद पवारांचे शेतीतील योगदान
छगन भुजबळ म्हणाले, “देशात कृषिमंत्री म्हणून शरद पवार साहेबांचे मोठे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी दिलेले योगदान आपण मान्य केलेच पाहिजे. आजही ते शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढत आहेत.” पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेतृत्व आणि शेतकरी हितासाठी त्यांची बांधिलकी यांचा उल्लेख करत भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने अधिक संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली.
शेतकऱ्यांवरील बंधने हटवण्याची मागणी
शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. “पहिले संकट आहे अस्मानी, म्हणजेच पावसासारख्या नैसर्गिक आपत्ती. दुसरे आहे मानवनिर्मित संकट, जे शेतमालावर लादली जाणारी बंधने.” त्यांनी कांदा, इथेनॉल आणि इतर शेतमालावर लादल्या जाणाऱ्या आयात-निर्यात बंदीवर बोट ठेवले. “कांदा सुरू, कांदा बंद; इथेनॉल करा, इथेनॉल बंद. अशी बंधने का? कपड्यांवर, गाड्यांवर बंधने नाहीत, मग शेतमालावरच का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना स्वदेशीचा नारा देताना त्यांच्या मालाला बाजारपेठेत मुक्त संधी मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
अन्न साठवणूक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व
भुजबळ यांनी अन्न-धान्य साठवणुकीच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “शेतकरी अन्न पिकवतात, तेव्हाच माझे काम सुरू होते. जर शेतकऱ्यांनीच अन्न पिकवले नाही, तर माझे अन्न पुरवठा मंत्रालय बंद पडेल.” त्यांनी सरकारला आवाहन केले की, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल असे कोणतेही धोरण राबवू नये. “स्वदेशीचा नारा देताना शेतकऱ्यांना जगवावे लागेल. त्यांच्यासाठी बाजारपेठेची दारे खुली ठेवावी लागतील,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारला उपरोधिक सल्ला
महायुती सरकारमधील मंत्री असूनही भुजबळ यांनी शेतकऱ्यांवरील बंधनांबाबत अप्रत्यक्षपणे सरकारच्या धोरणांवर टीका केली. “मी हे बोलणे उचित नाही, कारण मी स्वतः सरकारचा भाग आहे. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलणे माझे कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यांनी पुणे आणि नाशिकमधील अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिल्याचा उल्लेख करत पुन्हा शरद पवार यांच्या योगदानाची प्रशंसा केली.


