नाशिक : माजी नगरसेविका आणि काँग्रेसच्या माजी प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी राजकीय प्रवासात पुन्हा एकदा नवा टप्पा गाठला आहे. नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, अवघ्या दीड-दोन महिन्यांतच त्यांचे मन तिथेही रमले नाही आणि त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. आता, 19 ऑगस्ट रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसमधील नाराजी आणि पक्षत्याग
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची हेमलता पाटील यांची इच्छा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला ही जागा मिळाली नाही, ज्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदासह सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी माझे तिकीट कापून घातपात केला. माझा राजकीय मर्डर करण्याचा प्रयत्न झाला. भाजपची सत्ता असतानाही माझ्या मतदारसंघात चांगले वातावरण होते, तरीही काँग्रेसने नाशिकमध्ये एकही जागा मिळवली नाही. मला पक्षात भविष्य नसल्याचे लक्षात आल्याने मी काँग्रेस सोडली.”
शिंदे शिवसेनेतील अल्पकालीन वास्तव्य
फेब्रुवारी 2025 मध्ये हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. मात्र, हा प्रवेश त्यांच्या नियोजित योजनेचा भाग नव्हता. त्या म्हणाल्या, “मी फक्त शिंदे साहेबांशी चर्चा करण्यासाठी गेले होते, पण तिथे अचानक ‘शिवसेना स्टाईल’ माझा पक्षप्रवेश घडवून आणला गेला. ज्यांनी हा प्रवेश घडवला, ते माझे हितचिंतक होते, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलणार नाही. पण शिवसेनेतील कामाची पद्धत आणि गटबाजी मला रुचली नाही, म्हणून मी पक्ष सोडला.” अवघ्या दीड-दोन महिन्यांतच त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला आणि कोणत्याही पक्षात काम न करण्याचा निर्णय घेतला होता.


