Pigeon Feeding Ban: सार्वजनिक आरोग्याचा विचार करून मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घातली असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यापाऱ्याला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. दादर येथील रहिवासी आणि व्यापारी नितीन शेठ यांना कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारची कारवाई होण्याची ही देशातील पहिलीच घटना मानली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबईत कबुतरांमुळे पसरणाऱ्या श्वसनाच्या आजारांचा आणि अस्वच्छतेचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दादरसह अनेक भागांतील अनधिकृत कबुतरखान्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या निर्णयाला न जुमानता नितीन शेठ हे दादर परिसरात येऊन कबुतरांना दाणे टाकत होते. बंदी असूनही सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान व्यापाऱ्याने आपली चूक कबूल केली.
हेही वाचा – Dadar Kabutarkhana : डॉक्टर मूर्ख, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?; जैन धर्मसभेत कैवल्य रत्न महाराज बरळले
न्यायालयाचा कडक पवित्रा
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी या प्रकरणावर निकाल देताना स्पष्ट केले की, व्यापाऱ्याचे हे कृत्य सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी घातक होते. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ (ब) आणि कलम २७१ (आरोग्यास घातक आजार पसरवणे) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले की, हा निकाल एक उदाहरण (Precedent) म्हणून पाहिला जावा, जेणेकरून भविष्यात नागरिक अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार नाहीत.
उच्च न्यायालयाचेही निर्बंध कायम
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानेही या विषयावर सुनावणी घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने सार्वजनिक आरोग्याचे हित जपण्यासाठी महापालिकेने घातलेली बंदी योग्य ठरवत, कबुतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध कायम ठेवले होते.


