ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीतच चुरस निर्माण झाली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बदलापूरमधील सभेत शिंदे यांनी थेट हिंदीत घोषणा दिली,
“शिवसेना को हराना मुश्किल नही, नामुमकिन है!” असं ते म्हणाले.
शिवसेना शहरप्रमुख तथा उमेदवार वामन म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आलेल्या शिंदे यांनी भाजपवर थेट नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आणि विकासकामांचा मोठा पाढाच वाचला.
एकनाथ शिंदेंच्या भाषणातील ठळक मुद्दे :
– “मी दिलेल्या निधीचा एक-एक पैसा वामन म्हात्रेंकडून योग्य वापरला जाईल.”
– “बदलापूरला मोठ्या शहराला लाजवेल अशी प्रशासकीय इमारत मिळेल.”
– “पोशीर आणि शिलार धरण लवकरच मार्गी लावू.”
– “मेट्रो ५ आधी बदलापूरला पोहोचेल, रेड लाइन-ब्लू लाईनचा प्रश्नही सोडवला जाईल.”
– “काही लोक निधी घेऊन जातात पण एकनाथ शिंदेंचे नाव लिहित नाहीत. सत्ता येते-जाते, पण नाव जाता कामा नये.”
– “बदलापूरमधील प्रचंड विकास पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.”
– “विरोधकांनी सांगावं त्यांनी काय विकास केला? आमची कामंच बोलतात.”
– “खोट्या तक्रारींना बळी पडू नका, प्रशासनानेही खोट्या तक्रारींना थारा देऊ नये.”
– “लोकं आरोपांना नाही, कामांना मत देतात.”
युतीधर्म पाळताना अप्रत्यक्ष टोला
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बदलापूरच्या भाजप सभेत शिवसेनेवर थेट टीका टाळली होती. आज शिंदे यांनीही भाजपवर नाव न घेता “काही लोक निधी घेऊन नाव लिहित नाहीत” असा अप्रत्यक्ष टोला लगावला. स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते मात्र एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत.


