नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी 21 जुलै रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) उमेदवार कोण होणार, याबाबत देशभरात चर्चा रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी NDA चे उमेदवार म्हणून जाहीर केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (17 ऑगस्ट) नवी दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. या निर्णयामुळे आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांना संधी का?
भाजपच्या उच्चस्तरीय संसदीय मंडळाच्या बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राधाकृष्णन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांनी 1998 आणि 1999 मध्ये कोयंबतूरमधून लोकसभेत दोनदा प्रतिनिधित्व केले, 2003 ते 2006 दरम्यान तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले, आणि 2023-2024 मध्ये झारखंडचे राज्यपाल, तसेच तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे अतिरिक्त प्रभारी होते. 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
जे. पी. नड्डा यांनी राधाकृष्णन यांना “राज्यकर्ता” संबोधले आणि ते तामिळनाडूत सर्व समाजघटकांमध्ये आदरयुक्त व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. 2026 मध्ये तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण भारतातील भाजपच्या राजकीय रणनीतीला बळ मिळेल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
बैठकीत दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, गुजरातचे आचार्य देवव्रत, कर्नाटकचे थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे ओम माथूर आणि जम्मू-काश्मीरचे मनोज सिन्हा यांची नावेही चर्चेत होती. परंतु, राधाकृष्णन यांचे नाव पुढे आले.
NDA ची रणनीती आणि निवडणूक प्रक्रिया
NDA ने राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला एकमताने निवडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नड्डा यांनी सांगितले की, विरोधी पक्षांशी चर्चा करून शक्यतो बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. NDA मधील मित्रपक्ष, जसे की नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी, यांना या निर्णयाची माहिती देण्यात येत आहे. बिहारमधील हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी X वर पोस्ट करत राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला.


