अहमदनगर : भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर सांगलीतील एका कार्यक्रमातील भावकीच्या जुगलबंदीवरून जोरदार टीका केली आहे. शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर कर्जत-जामखेड मतदारसंघातील पराभवासाठी जबाबदार असल्याचा आरोप करत, त्यांच्या वक्तव्याने “टॉर्चर” होत असल्याचा गंभीर दावा केला आहे.
पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघ चर्चेत आला. 2019 मध्ये रोहित पवार यांनी शिंदे यांचा पराभव केला आणि 2024 मध्ये पुन्हा त्यांना धक्का देत हा मतदारसंघ कायम ठेवला.
शिंदे यांनी या पराभवाला अजित पवार यांच्याशी जोडले, जे महायुतीचे भागीदार असूनही त्यांच्या मतदारसंघात अपेक्षित सहकार्य न केल्याचा आरोप आहे. याबाबत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली आहे.
सांगलीतील भावकीचा वाद
सांगली येथील एका कार्यक्रमात अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात भावकीवरून शाब्दिक चकमक रंगली. रोहित पवार यांनी अजित पवारांना “गावकी संभाळताना भावकीकडे लक्ष द्या” अशी टिप्पणी केली.
यावर अजित पवारांनी “भावकीमुळे तू आमदार झालास, हे विसरू नको” असा टोला लगावला. या टिप्पणीने रोहित पवार यांच्यासह राम शिंदे यांनाही चांगलाच राग आला. शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “अजित पवार हे वक्तव्य सातत्याने करून मला टॉर्चर करत आहेत. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न का? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य निर्णय घ्यावा.” असं सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे, याबाबत आता वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


