मुंबई : गणेश चतुर्थीच्या उत्साहात देशभर रंगलेले असताना, विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंपाऊंड, स्वामी समर्थनगर येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा एक भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एका चिमुकलीचा पहिल्या वाढदिवसादिवशीच तिच्या आईसह दुर्दैवी अंत झाला, तर तिचे वडील अद्याप बेपत्ता आहेत.
माय-लेकीचा करुण अंत
ही दुर्घटना रमाबाई अपार्टमेंटच्या मागील भागात मध्यरात्री घडली. या घटनेत 24 वर्षीय आरती ओमकार जोयल आणि तिची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोयल यांचा मृत्यू झाला. जोयल कुटुंबीय आपल्या चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी करत असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचे वडील अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आतापर्यंत 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी नऊ जण जखमी असून, त्यांच्यावर रिद्धी विनायक, प्रकृती, चांदनसर आणि संजीवनी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांनी सांगितले की, सुमारे 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. पालघरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनीही याची पुष्टी केली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिस युद्धपातळीवर काम करत असून, अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे.


