Namo Shetkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते.
दरम्यान, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते देण्यात आले असून, २२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात. पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पुढील हप्ता अपेक्षित आहे. परिणामी, फेब्रुवारीत शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी एकूण ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
९० ते ९४ लाख शेतकऱ्यांना लाभ
राज्यात नमो शेतकरी योजनेचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठ दिवसांच्या आत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


