KDMC: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचे ५ आणि ठाकरे गटातून मनसेत परतलेले २, अशा एकूण ७ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. या नव्या समीकरणामुळे महापालिकेत शिंदे-भाजप युतीचा मार्ग अधिक सुकर झाला असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाला मात्र मोठा राजकीय धक्का बसला आहे.
सत्तास्थापनेचे गणित आणि ‘मनसे’ फॅक्टर
केडीएमसीमध्ये सत्तास्थापनेसाठी आणि बहुमतासाठी ६२ या जादूई आकड्याची आवश्यकता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, शिंदे गटाकडे ५३ नगरसेवक असून ते आज कोकण भवनात गट नोंदणीसाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे भाजपचे ५० नगरसेवक सोबतीला आहेत. आता यात मनसेच्या ७ नगरसेवकांची भर पडल्याने शिंदे-भाजप युतीने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक आधी ‘बेपत्ता’ झाले होते आणि नंतर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ ‘मनसे’ पक्षात प्रवेश करून शिंदे गटाला बळ दिले आहे.
कल्याण-डोंबिवलीवर पुन्हा एकदा युतीचा भगवा
ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याने खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मशालीच्या चिन्हावर निवडून येऊन गद्दारी करणाऱ्यांवर अपात्रतेची कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. फुटलेले नगरसेवक पूर्वी कोणत्या पक्षात होते याला आता महत्त्व नाही, त्यांनी पक्षाची आचारसंहिता पायदळी तुडवली आहे, असे सांगत राऊत यांनी नैतिकता आणि नीतिमत्ता विकणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच, या राजकीय हालचालींमुळे कल्याण-डोंबिवलीवर पुन्हा एकदा युतीचा भगवा फडकणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.


