Nishikant Dubey on Raj-Uddhav Thackeray: देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (महायुती) ११८ हून अधिक जागांवर आघाडी घेत बहुमताचा ११४ हा जादुई आकडा ओलांडला आहे.
या विजयाचे संकेत मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचत “लवकरच मुंबईत येऊन तुमची भेट घेतो,” असा टोला लगावला आहे. “मुंबईत मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत.
मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांचेच योगदान आहे. विकासयुक्त, विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. गृहमंत्री अमित शाह तर रणनीतीचे माहिर आहेतच.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
निशिकांत दुबे आणि ठाकरे बंधूंमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध !
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील अमराठी मुद्द्यावरून दुबे आणि ठाकरे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना “पटक पटक के मारेंगे” अशी धमकी दिली होती. त्याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी “दुबे दुबे के मारेंगे” असा इशारा दिला होता. याच वादाचा संदर्भ घेत, आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असताना दुबेंनी ठाकरेंना डिवचण्याची संधी सोडलेली नाही.


