मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ उपजिल्हाधिकार्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून, यासोबतच २३ अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवड श्रेणीत बढती मिळाली आहे.
यामुळे २३ अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला आहे. हा निर्णय महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी बढती झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, “हे त्यांच्या कर्तृत्वाचे फळ आहे,” असे म्हटले.
महाराष्ट्रातील महसूल विभागात गेल्या चार-पाच वर्षांपासून उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांवर रिक्तता होती, ज्यामुळे विकासकामांना आणि प्रशासकीय कामांना खोळंबा होत होता. उच्च न्यायालयाने नुकतीच उपजिल्हाधिकार्यांच्या पदोन्नतीसाठी मार्ग मोकळा केला असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. या बढतीमुळे विभागातील शिथीलता दूर होईल आणि जिल्हास्तरावर अधिक कार्यक्षमता येईल, असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.
या निर्णयाची घोषणा दिवाळीपूर्वी करण्यात आल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. मंत्री बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाची सूचना केली होती. यासोबतच, भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेतली असून, वेतनश्रेणी वाढीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


