BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जवळ येत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. मुंबईतील शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांची आज अधिकृत गट नोंदणी होणार असून, त्याआधीच महानगरपालिकेतील शिवसेना गटनेतेपदासाठी अमेय घोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
शिवसेनेतील तरुण, अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक म्हणून अमेय घोले यांची ओळख आहे. गेल्या तीन टर्मपासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत असून, महानगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना सखोल अनुभव आहे. मजबूत जनसंपर्क आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळेच गटनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात एकत्र येणार असून, येथून सर्वजण कोकण भवनात गट नोंदणीसाठी रवाना होणार आहेत. यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी जाणार होते, मात्र हा प्रयत्न फसला होता. अखेर आज भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकत्रच कोकण भवनात जाणार आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेत खेळलेला ‘मास्टरस्ट्रोक’ चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपच्या ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी होणार असताना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र गट नोंदणी होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे. यामुळे स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ वाढणार असून, प्रस्ताव मंजुरीत कोणताही अडथळा येणार नाही, असे चित्र स्पष्ट झाले आहे.


