मुंबई : अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावर बहुमत मिळाले. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला एकूण ११८ जागा मिळाल्या, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढत देणाऱ्या ठाकरे बंधूंच्या आघाडीला ७१ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने २४ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपला अपेक्षेइतका मोठा विजय मिळवता आला नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मुंबईत तब्बल तीन दशकांनंतर भाजपचा महापौर बसण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, त्यांच्या सोबतीला शिंदे गट असेल. मात्र ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, जिथे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा पाया रचला आणि आजवर मराठी महापौर दिले, त्या मुंबईत आता मराठी महापौर नसेल, यावरून ठाकरे गटात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत भावनिक आणि आक्रमक शब्दांत सात जळजळीत सवाल उपस्थित केले आहेत. “राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलं?” असा थेट सवाल करत त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले.
चित्रे म्हणाले की, चिन्ह, पक्ष आणि नेते घेतल्यानंतरही शिवसेनेचे तब्बल ५६ नगरसेवक फोडून निवडून आले केवळ २८. मग शिवसैनिकाला दुबळं करून नेमकं काय साध्य झालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेसाठी शिवसेना फोडून भाजपच्या कमळाला बांधून मुंबई गमावण्याचा दोष त्यांनी शिंदे गटावर ठेवला.
अखिल चित्रेंचे सात सवाल
- स्वतःला शिवसेना आणि बाळासाहेबांचे पाईक म्हणवून काय मिळवलंत?
- ज्या मुंबईत शिवसेना जन्माला आली, तिथून तिला हद्दपार करण्याच्या कटात सहभागी होऊन काय साध्य केलं?
- “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे” या बाळासाहेबांच्या निर्धाराला तडा देऊन काय मिळवलंत?
- सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना फोडून भाजपच्या दावणीला बांधून काय साध्य केलं?
- ५६ नगरसेवक फोडून केवळ २८ निवडून आणले, मग शिवसैनिकाला कमकुवत करून काय मिळवलंत?
- शिवसेनेचं प्रभुत्व संपवून राजधानीत भाजपाचा महापौर बसवून मराठी अस्मितेचं काय केलं?
- थैलीशहांसाठी आपली मुंबई विकून काय मिळवलंत?
या सवालांमुळे महापालिका निकालानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


